Electricity Bill मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आम्हीही अशी योजना सुरू करणार असल्याचे आता विरोधक सांगत आहेत. लाडक्या बहिणींच्या प्रपंचाला हातभार लावला; पण लाडका भाऊ उपाशी राहिल्याची टीका विरोधकांकडून होते. पण, त्यांच्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १५) अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार म्हणाले, की महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. गरिबांच्या मुलींना शिक्षणात कुठे अडथळा येऊ नये, याकरिता त्यांना शिक्षण मोफत केले. वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देऊ केले. शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली.
एक रुपयात पीकविमा योजना आणली. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देऊ केले. सरपंच, उपसरपंच, कोतवाल, पोलिस पाटील, होमगार्ड आदी सर्वांच्या मानधनात वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या दृष्टिकोनातून शिवराय-शाहू-फुले- आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हातात द्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. विकासकामे करताना आम्ही जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. सर्वांना समान न्याय दिला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आम्ही चालत असल्याचे त्यांनी सांगितले. Electricity Bill