Ativrushti Madat ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली. राज्यातील ७ जिल्ह्यांमधील जवळपास १० लाख शेतकऱ्यांना ९९७ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
यासोबतच जुलै २०२३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास १८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे? तर यात मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. Ativrushti Madat
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या सव्वापास लाख शेतकऱ्यांना ५४८ कोटी ५९ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांमध्ये २ लाख ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. लातूर जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ३८४ कोटी ४५ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यासाठी ५४ कोटी. ६२ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ९ कोटी ३२ लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली. तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना १४ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली.
मदत कशी मिळणार?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त ३ हेक्टरपर्यंतच मदत दिली जाईल. तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे. जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत दिली जाणार आहे. तर बागायती पिकांसाठी २७ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बहुवार्षिक म्हणजेच फळपिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी मदतीची मागणी विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ही मदत मंजूर केली. तसेच हंगामात एकदाच पीक नुकसानीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देत असते.